Monday, January 14, 2019

‘खोट्याचा खरेपणा’

‘खोट्याचा खरेपणा’



मागे मी खोट्याचा बाजार हि एक पोस्ट लिहिली होती तिला आपण सर्वांनी अत्यंत सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. आज मी आपल्यासमोर त्याच विषयाला धरून काही सांगणार आहे. आज होत असलेला खोटेपणा तर आपण पहिला तो आपल्यासाठी काही नवीन नाही. जुन्या काय तर आजच्याही नाणी आणि नोटांची खोटी बनतात आणि ती बाजारात चालतात सुद्धा. मागे तर  एकदा प्रवासात मला एकाने ५ चा खोटा ठोकळा दिला होता. असो.

मी तर म्हणेन कि आपल्याकडे जो वारसा चालत आलाय त्यातूनच खोटेपणाहि आपल्याला मिळाला कारण काही शेकडो वर्षांपूर्वीपासूनच या खोट्या नाण्यांची परंपरा आपल्याकडे चालत आलीये आणि अश्याच एका उदाहरणाबद्दल मी आज आपल्याला सांगणार आहे.
  
वाहत्या नदीचा प्रवाह आपल्यासोबत बरच काही घेऊन येत असतो चांगल, वाईट, खरं, खोटं असं त्यात काही नसत. पण ती वस्तू त्या नदीच्या बाहेर आल्यावर तिचा खरे-खोटेपणा, बरोबर- चूक आपण माणसं ठरवतो. एक गोष्ट जी आपल्या नजरेतून बरोबर असते तीच गोष्ट समोरच्याच्या नजरेत चुकीची असू शकते आणि असच काही मध्ययुगीन भारतात झालं असावं.

आम्ही नाणी संग्राहक आणि अभ्यासक लोक म्हणजे एखाद्या भटक्या पेक्षा कमी नसतो, इतिहासाच्या या साक्षीदारांच्या शोधात आम्ही गाव- गाव हिंडतो आणि असचं एक दिवस मी पैठण हिंडत होतो फिरताना एकाकडनं एक चांदीच नाणं मी विकत घेतलं, ती त्याला गोदावरीची देणं होती त्याला ते नाणं गोदावरी नदीत मिळालं होतं. तेव्हा त्या नाण्याकडे मी काही फार निरखून पाहिलं नाही आणि तसच खिशात टाकलं. घरी आल्यावर नाणं पाहिलं जरा स्वच्छ केलं. नाण्यावर तर फक्त वरच चांदी दिसत होती आत तांबं होतं. त्या नाण्यावर फक्त वरून चांदीचा मुलामा दिलेला होता.  त्या क्षणी तर मला वाटलं कि आपण नाणं घेण्यात फसलो आणि आपण खोटे नाणे घेतले पण ते तसे नव्हते. ते खोटे नाणे होतेच पण आता बनलेले नव्हे तर त्याच काळी बनलेले खोटे नाणे ! आणि हि तर चांगलीच गोष्ट होती. एक नाणी अभ्यासक म्हणून हे नाणेही संग्रहात हवेच होते आणि ते मला मिळाले आणि अगदी स्पॉट वरून ते फार छान झाले. काल झालेला खोटेपणा आजचा इतिहास बनला. आता त्या नाण्याबद्दल सांगतो, ते नाणे होते औरंगझेब अलामगिराचे. जशी आज आपल्याकडे खोटी नाणी बनवतात त्याच प्रमाणे त्याकाळी कुणीतरी या नाण्यांची डाय बनवून किंवा चोरून स्वतःच तांब्याची नाणी बनवून त्यावर चांदीचा मुलामा चढवून (जेणे करून ती अस्सल वाटावीत) ती चलनात आणली. हि नाणी त्याकाळी किती लोकांना कळाली आणि किती काळ चालली ते माहिती नाही पण हे नाणे ज्यावेळी नदीतून प्रवास करत आले तेव्हा त्याच्या वरील चांदीच्या मुलाम्यास काही इजा झाली आणि नाणे खोटे असल्याचे अस्सलपण पुढे आले आणि महत्वाबद्दल बोलाल तर आज या नाण्याचे महत्व तेवढेच आहे जेवढे एका खर्या नाण्याचे. नाण्याचे वजन अगदी बाकी रुपयांचे असते तेवढेच आहे ११ ग्राम.  हे नाणे सुरत टांकसाळीच्या डाय नी पाडलेले आहे. हि सर्व नाणी हातोडा डाय वर मारून बनवली जायची ज्याला इंग्लिश मध्ये Die struck Technique म्हणतात. औरंगज़ेब आणि त्यानंतरच्या मुघलांची नाणी अगदी  सुटसुटीत आहेत. याच नाण्याबद्दल बोलायचं झालं तर नाण्यावर पुढील बाजूनी 'सिक्का झद दर जहान चू बद्र इ मुनीर बादशाह औरंगजेब आलमगीर' लिहिलेले असून औरंगजेब आलमगीर या शब्दात नाणे पाडले ते हिजरी वर्ष १०९८ म्हणजेच इ.स . १६८६ दिलय. तर मागील बाजूनी 'झर्ब सुरत सनह ३० जुलूस मैमनात मानूस' असून सनह ३० हे नाणे औरंगजेबाचे राजवर्ष ३० सुरु असताना पाडले असल्याचे दर्शवते.


तर असे आहे हे औरंगजेबाचे त्याच काळी बनवलेले खोटे नाणे ! आणि असा होता या नाण्याचा गोदावरी नदीपासून माझ्यापर्यंत येण्याचा प्रवास ! 

(सोबत खर्या आणि त्या काळात बनलेल्या खोट्या अश्या दोन्हीची नाण्यांचे फोटो जोडत आहे)

लेख आवडला असल्यास पुढे शेयर करा.


आपलाच
आशुतोष पाटील.
#HiStoryteller #AshutoshPatil